चाळीसगावात मशालीची लाट! लागेल कमळाची वाट! देशमुख, राठोड, चव्हाणांच्या करिष्माईने उजळेल पुन्हा उन्मेशपर्वाची पहाट!

 विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार अंतीम टप्प्यात आहे.सभा, आरोप प्रत्यारोपांनी वातावरण अगदी ढवळून निघालय. दावे प्रतिदावे सर्वच पक्षांकडून कऱण्यात येत आहेत. काही खाजगी संस्था व प्रसिद्धी माध्यमांकडून जमिनी हकीकत जाणून घेत निकाल काय येवू शकतो याचे अंदाजही बांधले जात आहेत. निवडणुकीची खाज, सत्ता आणि पैशांचा माज यांच्या जोरावर बऱ्याच मतदार संघात विकासाचा नुसता देखणा साजही चढविला गेल्याचे दिसुन येत आहे. बहुतांशी ठिकाणीं सत्ता आणि गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीच्या बळावर दहशत,गुंडगिरी, वाळू माफिया, भूमाफिया, अमलीपदार्थ यांच्या विकासाला अधिक खतपाणी घालून सर्वसामान्यांच्या विकासाचा गळा घोटला गेल्याचे चित्र समोर येत आहे.मतदार संघाच्या शांती आणि सलोखा,संस्कृती आणि संस्कार या तत्वांना तिलांजली देवून लोकप्रतिनिधीच उर्मट व संस्कृतीहिन झाल्याने जनता दिशाहीन झालेली  असे एकंदरीत चित्र दिसुन येत आहे.राजकिय नेत्यांचा बोलण्याचा स्तर तर इतका खालावलेला आहे की ना कुणाला वयोमर्यादाच भान उरलय ना मानमर्यादाच. जनता मोठया अपेक्षेने ज्यांच्याकडे देशाचे, राज्याचे भवितव्य सोपविते. तेच नेते किती खालच्या पातळीचे आहेत याच प्रदर्षण जनता रोज प्रसार माध्यमांवर पहात आहे.

चाळीसगांव विधानसभेची परिस्थिती यापेक्षा वेगळी कशी असु शकते. या मतदार संघाची भटकंती करून जमिनी हकीकत आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली असता अतिशय विदारक चित्र या मतदार संघाचे दिसुन आले.

या विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात जनतेच्या विकासासाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या त्यांच्या पदरात टाकून सक्षम करणे अपेक्षित होते. जे प्रयत्न उन्मेश पाटील यांनी आमदार असताना केले होते असं लोकं सांगतात.त्या नंतर या महत्त्वाच्या विषयावर या पाच वर्षात पूर्णत्व दुर्लक्ष इथल्या लोकप्रतिनिधीकडून झालेले दिसुन आले आहे. शहरात व तालुक्यांत दहशत,गुंडगिरी, वाळू माफिया, भूमाफिया, अम्लिपदार्थ यांना ऊत आला आहे. पर्यायाने व्यसनाधीनता वाढीस लागल्याने खूण, गोळीबार सारख्या घटणा मागच्या वर्षात घडल्या.तालुक्यात दहशत व भितीचे वातावरण आहे. ड्रग्स माफिया दोन दिवस चाळिसगाव मध्ये कुणाकडे मुक्कामी होता?, शुभम अघोने यांचा निर्दयीपणे झालेला खूण,नगरसेवकांवर कऱण्यात आलेला गोळीबार या घटनांचा सगळा रोख एकाच लोकप्रतिनिधीकडे जनतेचा दिसुन येणं ही अतिशय गंभीर बाब या ठिकाणी प्रकर्षाने दिसुन आली.येथे एमआयडीसी असुन नवीन कुठलेही उद्योग न आल्याने बेरोजगारी मोठ्याप्रमाणावर वाढली असल्याने तरूण दिशाहीन झाले आहेत. मुलाला नोकरी, रोजगार नाही त्यामुळे त्याचे लग्न होत नाही या विवंचनेत प्रत्येक आईवडील चिंताग्रस्त आहेत. सार्वजनिक विकासकामे झाली. ते कुणीही लोकप्रतिनिधी असला तरी ते होतच राहतात. त्यात काही जनतेला नवल वाटतं नाही.मात्र शेतकरी, तरूण, तरुणी, महिला, उद्योजक, व्यावसायिक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे ते झालेले दिसत नाहित.

आम्ही अडचणीत आहोत, अनेक समस्यांनी चिंताग्रस्त आहोत पण आमचा लोकप्रतिनिधी आम्हाला उपाशी ठेवून स्वतः मात्र तुपाशी आहे. आमच्या पदरात योजना टाकून आमचा विकास जरी झाला नसेल तरी आमच्या लोकप्रतिनिधीचा एकट्याचा विकास झाला. याचा गर्व करावा की चुकीच्या माणसाला मत दिल म्हणून थोबाडीत मारून घ्यावी अशी आमची परिस्थिती आहे अशा संतप्त भावना बहुतांशी जनतेतून व्यक्त होताना दिसल्या.

अरे महागाईने आमचं कंबर मोडल, जिवन जगणं अवघड झालंय, पोटाला चिमटा देवून पोरगं शिकविल परंतू त्याला नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. आता म्हणलं आमचा आमदार हजार पंधराशे कोटीची जमीन घेणार आहे तिथं देवू की पाठवून पोराला खुरपायला. पाणी सोडणाऱ्याच पोरगं आमदार झाल्या झाल्या कोट्यधीश होतंय. इथ हाडाची काड आणि घामाच पाणी करून बी नाही होता आल शेतकऱ्याला लखपती.अशा संतप्त भावना एका सत्तरीतल्या वयोवृद्ध शेतकऱ्याने व्यक्त केल्या.

उन्मेश पाटील यांनी पाच वर्षात धरण बांधलं. पण त्या नंतर आताच्या आमदाराला पाच वर्षात आयत पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविता आल नाही. शेतकरी नेहमीच अस्मानी सुलतानीला तोंड देतो. महागडी खते, बियाणे टाकून, रात्रंदिवस राबून हाती काही लागत नाही. म्हणून आम्हीं जोडधंदा म्हणून पशू पालन करतो. त्यातही दुधाला भाव नाही. आमच्या हक्काचे बोनस मिळत नाही.70 किलोच कांडीच पोत 1700 ला मिळत होत.आता भरती 50 किलोची करून भाव तोच.सांगा कसा जगल शेतकरी. दूध संघाचा चेअरमन आमचाच असताना हे दिवस आम्हाला पाहायला मिळत असतील तर कुठलं भूषण आणि का म्हणून आम्ही बाळगाव. कुठल्या तोंडाने त्यांना शेतकऱ्यांकडे मत मागण्याचा अधिकार आहे. अशी संतप्त भावना गिरणा पट्ट्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत.

चाळिसगाव तालुक्यातील जनतेच विश्वासाचे आणि मराठा समाजाचे आस्थेचे ज्ञानमांदिर म्हणजे राष्ट्रीय विद्यालय. या विद्यालयाची जागा लोकप्रतिनिधींनी  हडप केल्याने समाजात तीव्र संताप आहे. राजीव देशमुख, उन्मेश पाटील यांच्यासह अनेक आमदार झालेत पण या माणसासारखी शिक्षण संस्थेची जागा हडप करण्याची दुर्बुद्धी त्यांना कधी सुचली नाही. अशी भावना माराठा समाजातल्या एका जुन्या जाणत्या नेत्याने व्यक्त केली.

रायगडावर शेकडो तरुण घेवून जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आस्था दाखविणारा लोकप्रतिनिधी महाराजांचा पुतळा निव्वळ सरकारच निष्क्रिय धोरण आणि गैरव्यवहार यामुळे कोसळल्यावर मूकबधिर होवून सरकारचा निषेध व्यक्त करत नसेल तर यावरुन लक्षात येतं की त्यांच महाराजांबद्दल प्रेम कीती बेगडी आहे. अशी भावना गड किल्ले सवर्धनावर जनजागृती करणाऱ्या एका सद गृहस्थाने व्यक्त केली.

तालुक्यातील जनतेत व विशेष करून मराठा समाजात ज्या एका गोष्टीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधी बद्दल अधिक राग दिसुन आला ती गोष्ट म्हणजे की, त्यांच असं म्हणणे आहे की, दोघं जण त्यांच्या त्यांचा जागेवर स्थिरस्थावर असताना, एकमेकाला नडत नसतांना उन्मेश पाटील यांच्या बाबतीत जे काही षडयंत्र रचून खाच्चिकरणाची दुर्बुद्धी सुचली ही बाब समाजाला अजिबात पचनी पडलेली नाही. यामुळे त्यांनी स्वतःच स्वताच्या पायावर दगड मारून घेतलाय. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही.

ओबीसी घटकामध्ये देखील तितक्याच तिखट प्रतिक्रिया विद्यमान लोकप्रतिनिधी बद्दल ऐकायला मिळाल्या. त्यांच असं म्हणणे आहे की, ओबीसी समाजाचे व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे वडिलांच्या वयाचे असताना देखील त्यांच्या बाबतीत वयाचे, मानमर्यादाचे भान न ठेवता जे काही अपशब्द आमदार नेहमी वापरतात त्यामुळे ओबीसी घटकाच्या व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. 
 
वरील सर्व गोष्टी व जनतेच्या भावना लक्षात घेता तसेच उन्मेश पाटील यांच्या बरोबर माजी आमदार राजीव देशमुख, मोरशिंग राठोड, सुभाष चव्हाण यांची मोठी उभी राहिलेली ताकद यामुळे महाविकस आघाडीचे पारडे जडच नव्हें तर मशालीच्या लख्ख प्रकाशात उन्मेशपर्वाची पहाट नक्की सोनेरी किरणे घेवून उजळण्याची चिन्हे स्पश्टपणे दिसत आहेत.









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215